आपल्या तूफान नृत्याने आणि अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव सर्वांनाच परिचित आहे. तिच्या कार्यक्रमांप्रमाणेच ती आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. पण या सगळ्या झगमगत्या विश्वापासून दूर, स्वत:चं एक वेगळं ( कल्पनेचं) जग निर्माण करता येतं, अशा पुस्तकांच्या जगात आज तिने प्रवेश केला. पुण्यामध्ये सध्या ‘पुणे बूक फेस्टिव्हल’ सुरू असून त्याला फक्त पुणेकरांचाच नव्हे तर इतर शहरातील वाचकांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुण्यातील वाचकांसह इतर शहरातील वाचकही या बूक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत असून सोशल मीडियावरही याचा बराच बोलबला आहे.
याच बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली. ‘ आतापर्यंत मी नाचायला जात असते, आज मात्र वाचायला आले आहे’ असे म्हणत गौतमीने या बूक फेस्टिव्हलमध्ये येऊन आपण खूप उत्साहित असल्याचे नमूद केलं. नेहमी डान्स करत असते आज मात्र मी वाचनासाठी आले आहे, आतापर्यंत वाचनासाठी वेळ काढत नव्हते, पण आता फावल्या वेळेत वाचनाची ही चांगली सवय जोपासणार असल्याचे तिने नमूद केलं.
कोणतं पुस्तक घेऊन जाणार गौतमी ?
मी लहानपणापासून या गोष्टींमध्ये कधी गेलेच नाही. आत्तापर्यंत मी फक्त डान्स डान्स करत होते, पण आज काही वेगळं करायला आले आहे असं गौतमीने सांगितलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे. आजपर्यंत मला पुस्तकं वाचायची संधि तर मिळाली नाही, पण आज इथे येऊन पुस्तकांच्या या दुनियेत मी फेरफटका मारणार आहे. इथून पुढे मी पुस्तकं नक्की वाचणार आहे असे सांगतानाच तुम्ही सगळ्यांनीही आवर्जून पुस्तकं वाचा असं आवाहन तिने सर्व वाचकांना केलं. पुस्तक ही खूप छान गोष्ट आहे , त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं, मीही आता वाचाणार आहे, तु्म्हीही सर्वांनी नक्की वाचा, असा प्रेमळ आग्रह गौतमीने केला.
आज या पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची असा काही ठोस विचार मी केलेला नाही, उलट प्रवीण ( तरडे) दादांनाच मी सांगितलं की तुम्ही मला सुचवा पुस्तकांची नावं,कोणती पुस्तकं घेऊ ते सांगा. पण छत्रपती शिवाजी महाराजाचं पुस्तक मी नक्की घेणार आणि ते आवडीने वाचणार असल्याचं गौतमीने सांगितलं.