Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?

| Updated on: Dec 05, 2021 | 12:38 PM

नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध छातीत भरून घ्यावा. रोमारामातून अनुभवावा. त्या पुस्तकावरून हात फिरवावा. त्याचा दरवळ सभोवताली असावा. अशी वाटणारी माणसे खरेच कमी झाली आहेत का?

Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?
नाशिकच्या साहित्य संमेलनात रसिकांनी पुस्तक विक्रीकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध छातीत भरून घ्यावा. रोमारामातून अनुभवावा. त्या पुस्तकावरून हात फिरवत रहावं. त्याचा दरवळ सभोवताली असावा. अशी वाटणारी माणसे खरेच कमी झाली आहेत का, असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे नाशिकमध्ये असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पुस्तक खरेदीकडे रसिकांनी फिरवलेली पाठ. संमेलनात पुस्तकांचे जवळपास दोनशेच्या आसपास स्टॉल आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत ग्राहकांनी म्हणावी तशी पुस्तक खरेदी केली नाही. अनेक वितरकांनी जाण्या-येण्याचा खर्चही निघाला नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे रसिकांचा कल ऑनलाईन वाचनाकडे वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले.

कोरोनानंतर फटका

कोरोना आला आणि काही-काही व्यवसाय गाळात जायला सुरुवात झाली. याची कुऱ्हाड ग्रंथ विक्रीवर तीव्रतेने बसल्याचे जाणवले. अफवांमुळे सुरुवातीला अनेक दिवस घराघरामध्ये यायचे पेपर बंद झाले. त्या काळात अनेकांनी कोरोनाचा विषाणू पेपर, पुस्तक, कागदावरून घरी येईल म्हणून त्यांची खरेदीच बंद केली. त्यानंतर घसरलेली पुस्तक विक्रीची गाडी नाशिकच्या साहित्य संमेलनात तरी रुळावर येईल अशी शक्यता होती. मात्र, यंदा तरी ती शक्यता मावळल्याचे दिसले.

स्टॉलची रांग लांबलचक

साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रकाशक आले आहेत. संमेलन उद्घाटनाच्या आदल्यादिवसापर्यंत पाऊस होता. संमेलनाच्या पहिल्या दिवशीही ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रसिक संमेलनाकडे पाठ फिरवतील, अशी शक्यता होती. मात्र, पहिल्या, दुसऱ्या आणि आज तिसऱ्या दिवशीही हजारो रसिकांनी हजेरी लावली. मात्र, त्यांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसले. साधना प्रकाशनचे मनोहर पाटील म्हणाले की, यंदा म्हणावी तशी पुस्तक विक्री झाली नाही. आज शेवटचा दिवस आहे. थोडाफार व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा आहे. इथे पुस्तकाच्या स्टॉलची आखणीही योग्य नाही. खरे तर गोलाकार रचना राहिली असती, तर कदाचित फरकही पडला असता.

वाहतूक खर्च निघणे अवघड

साहित्य संमेलनात औरंगाबादच्या तुला ग्रंथ प्रकाशन आणि वितरण पुस्तक दालन होते. या ठिकाणी मराठी आणि हिंदीतील अतिशय दर्जेदार पुस्तके विक्रीला होती. त्यात चंद्रकांत देवताळे, विनोदकुमार शुल्क, कुमार अम्बुज तरुणांचा लोकप्रिय कवी गीत चतुर्वेदी आणि मराठीतील अनेक दिग्गजांची पुस्तके होती. संमेलनात ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांनी खूप कमी प्रतिसाद दिला. अक्षरशः औरंगाबादहून जाण्या-येण्याचे प्रवासभाडे आणि पुस्तकांच्या वाहतुकीचा खर्च निघणेही अवघड असल्याची प्रतिक्रिया तुला ग्रंथ वितरणचे वाल्मिक वाघमारे यांनी दिली. इतर वितरकांचाही सूर असाच होता.

स्टोरीटेलला प्रतिसाद

नाशिकच्या साहित्य संमेलनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे रसिकांचा ऑनलाईन वाचनाकडे कल असल्याचे दिसले. संमेलनात स्टोरीटेल अॅपचा स्टॉल होता. या स्टॉलवर रोज हजारो रसिकांनी हजेरी लावल्याचे चित्र होते. त्यातही तरुण मुलांचा सहभाग जास्त होता. अॅप कसा डॉऊनलोड करून घ्यायचा, सबस्क्राईब कसे करायचे, काय प्लॅन आहे, याची माहिती त्यांनी घेतली. स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार म्हणाले की, स्टोरीटेल अॅपकडे वाचकांचा ओढा वाढला आहे. रोज कमीत-कमी दोनशे ते तीनशे जणांनी आमच्या इथे स्टॉलवर पैसे भरून अॅप मोबाईलमध्ये घेतला. हजारो रसिकांनी विचारणा केली. येणाऱ्या काळात लोकांचा डिजीटल वाचनाकडे कळ वाढेल. पाच वर्षांत चित्र वेगळेच असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


इतर बातम्याः

87 वर्षांचा तरुण, काळजात लोकशाहीचे धगधगते स्पिरीट, ओठात कैसे ढूंढना पाऊ…साहित्य संमेलनात भटकळांची मोहनमाया!

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट काढणार; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा, एकाचवेळी 50 ग्रंथांचे प्रकाशन