उमेश पारीक, नाशिक | 28 ऑक्टोबर : यंदा पाऊस कमी पडल्याने आताच पाणी टंचाईने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णयाने नाशिकच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण केवळ 55 टक्के भरले आहे. माणसांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र असताना अशा प्रकारे मराठवाड्याला पाणी सोडल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या वक्रकार गेट जवळ भाजप पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.
राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने ऑक्टोबर महिन्यातच पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सुदैवाने धरणाच्या क्षेत्रात पाऊस झाल्याने धरण भरले आहे. मात्र हा पाणी साठा नाशिक जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्याची गरज असताना हे पाणी खाली जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेतल्याने माणसाला आणि जनावरांना प्यायला पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय चुकीचे असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या वर्षी पिण्याचे पाणी कमी पडणार आहे. हे पाणी नाशिकसाठी आरक्षित ठेवावे अशी मागणी भाजप नेत्या अमृता पवार आणि शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी बाबासाहेब गुजर, राजाराम मेमाणे, लहानू मेमाणे, श्रीहरी बोचरे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे. 1905 साली समन्यायी पाणी वाटप निर्णयाचा कायदा झाला तेव्हा पासून हे पाणी वाटप होत आहे. परंतू त्यानंतर लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. जे पिण्यासाठी आरक्षित ठेवायला हवे ते जायकवाडीला पाठविणे योग्य नाही. जनावराला प्यायला पाणी नाही. जायकवाडीतून दारुच्या कंपन्यांना पाणी जात आहे. दुष्काळी परिस्थितीत कंपन्यांचे पाणी बंद करून माणसांना, जनावरांना प्यायला हे पाणी राखीव ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.