सांगली | 25 ऑगस्ट 2023 : सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळ सह सात गावांतील गावकऱ्यांचे पाण्यावाचून गेली अनेक वर्षे हाल होत आहेत. या सात गावांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहे. या सात गावांना म्हैसळ योजनेतून पाणी मिळावे यासाठी मायथळ कॅनॉलमधून चर काढून माडग्याळच्या तलावात पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात खासदार फंडातून निधी मिळाल्यानंतर अखेर काम सुरु झाले होते. परंतू दुसऱ्याच दिवशी वनविभागाने ही जागा वनखात्याची असल्याने काम बंद पाडले. तेव्हा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या पायावर अक्षरश: साश्रु नयनांनी लोळण घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकार गतीमान असल्याचे कानीकपाळी ओरडून सांगितले जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ असे जाहीरातीतून भासविणाऱ्या महाराष्ट्र सरकारची प्रत्यक्षात मात्र निराळीच तऱ्हा उघडकीस आली आहे. सांगलीच्या जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हटले जात आहे. पावसाने ओढ दिल्याने आणखीन बिकट अवस्था झाली आहे. जत तालुक्यातील माडग्याळ सह सात गावांना पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे तापला आहे. या जत तालुक्यातील गावकऱ्यांनी आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या म्हणून जुलै महिन्यात आंदोलनही केले होते. या भीषण पाणी प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक जमदाडे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरवा केला.
मायथळ कॅनॉलमधून चर काढण्याच्या कामासाठी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर खोदकामासाठी शासनाच्या मशिनरी अखेर उपलब्ध झाल्या. त्यानंतर खासदार फंडातून डीझेलसाठी 12 लाखांचा निधी मिळाल्यानंतर अखेर कामाला सुरुवात झाली. मात्र दुसऱ्याच दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन ही जागा वनविभागाची असल्याचे सांगत काम बंद पाडले. आपल्या गावाला इतक्यावर्षांनंतर पाणी मिळणार म्हणून आनंदी असलेल्या शेतकऱ्यांना या घटनेने धक्काच बसला, त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागले.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या अक्षरश: धारा वाहू लागल्या. शेतकरी म्हणाले, ‘साहेब खूप वाईट परिस्थिती आहे. काम बंद करू नका, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाण्याची वाट पाहतोय, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांचे पाय धरले. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही पाझर फुटला नाही त्यांनी काम काही सुरू होऊ दिले नाही. त्यामुळे 400 हून अधिक शेतकरी माळावर आंदोलना बसून आहेत. जोपर्यंत हा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.