मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महाविद्यालयात बुधवारी सकाळी आग (fire in mumbai) लागल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांदिवली येथील केईएस कॉलेजमध्ये ही लागली असून इमारतीमध्ये नेमकी किती लोकं आहेत याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तसेच ही आग कशामुळे लागली, या संदर्भातही कोणतीही माहिती मिळालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नौपाड्यातही लागली होती आग
दरम्यान, मंगळवारी रात्री ठाण्यातील नौपाडा भागातील एका 10 मजली निवासी इमारतीला आग लागली, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली आणि सुदैवाने या दुर्घटेनत कोणीही जखमी झाले नाही, असे ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचे मुख्य अधिकारी यासिन तडवी यांनी पीटीआयला सांगितले.
मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास दमाणी इस्टेटमधील इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या आगीतून दोन ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.