एसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल, दिवाळीपर्यंत इतक्या गाड्यांचा होणार समावेश

| Updated on: Oct 20, 2024 | 1:09 PM

एसटी महामंडळाने अलिकडेच अशोक लेलँड कंपनीशी 2430 बसेस खरेदीचा करार केला होता. त्यातील पहिली बस दापोडी येथे दाखल झाली आहे. या बसेस अत्याधुनिक असून लांबपल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार आहे.

एसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल, दिवाळीपर्यंत इतक्या गाड्यांचा होणार समावेश
Follow us on

एसटी महामंडळात स्वमालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पहिली अशोक लेलँडच्या बांधणीची बस दापोडीत दाखल झाली आहे. अशा एकूण 2,430 बसेस महामंडळाला मिळणार आहेत. एसटी दिवाळी सणापर्यंत 300 गाड्या दाखल होण्याची शक्यता आहे.या बसेस आरामदायी आसनांच्या असून त्या स्वमालकीच्या असल्याने महामंडळाचा मोठा फायदा होणार आहे. एसटी महामंडळाने नुकताच अशोक लेलँड कंपनी सोबत बस खरेदीचा करार केलेला आहे.

एसटी महामंडळाकडे पूर्वी 18 हजार बसेसचा ताफा होता. परंतू गेली अनेक वर्षे नवीन बस खरेदी रखडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात जुन्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे 16 हजार बसेस आहेत. नवीन बसेस 2 बाय 2 आसनी असून डिझेलवर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लांबपल्ल्याच्या मार्गावर या बस चालविणे शक्य होणार आहे. एसटी महामंडळाकडे इलेक्ट्रीक बसेस देखील हळूहळू समाविष्ट होत आहेत. तसेच एलएनजीवर धावणाऱ्या बसेस देखील तयार करण्यात येत आहेत.एसटी महामंडळाने साल 2023 रोजी झालेल्या 303 व्या बैठकीत महामंडळाच्या एकूण पाच हजार डिझेल इंधनावर चालणाऱ्या बसेसचे लिक्विफाईड नॅचरल गॅस ( LNG ) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये रुपांतरण करण्याची योजना आखली आहे.

दापोडीत पहिली बस दाखल

दापोडी कार्यशाळेत एसटीची पहिली अशोक लेलँडने बांधलेली बस आली आहे. या बसेसचे रजिस्ट्रेशन दापोडीतच होणार आहे. या बसेस लांबीला मोठ्या आकाराच्या आहेत. त्यामुळे परिवर्तन बसेस प्रमाणे जादा प्रवाशांना सामावून घेता येणार आहेत. दिवाळीपर्यंत अशोक लेलॅंडच्या 300 गाड्या महामंडळाला मिळतील असे म्हटले जात आहे. या गाड्या महामंडळाच्या स्वमालकीच्या असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.एसटी महामंडळ यंदाच्या गणेश चतुर्थीच्या हंगामात प्रथमच फायद्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला नऊ वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट 2024 मध्ये 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये फायदा झाला आहे.