सांगली : जिल्ह्यातील आटपाडीमधील संकेत शिवाजीराव मोरे या मॅकेनिकल पदवीधर तरुणाने तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प उभा केलाय. विशेष म्हणजे तलावात हा पूर्ण प्रकल्प तरंगता आहे. 200 भर प्लास्टिक बॅरलचा वापर करून आटपाडी तालुक्यातील कामथ गावाजवळच्या डोंगरात असलेल्या तलावात हा तरंगता प्रोजेक्ट उभारण्यात आलाय. एकूण 75 लाखांचा असलेला हा प्रकल्प मागील 4 वर्षांपूर्वी उभारण्यात आला असून, यात आता त्याचा चांगला जम बसला आहे. तिलापिया आणि पंगेसियस दोन जातीचे एकूण 24 पिंजऱ्यात माशांचं उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमध्ये हा प्रकल्प उभारला गेलाय.
आतापर्यंत आपण मत्स्यशेतीचे अनेक प्रकार पाहिले. पण सांगलीतील आटपाडीमधील संकेत शिवाजीराव मोरे या तरुणाने केज कल्चर मत्स्य शेतीचा अनोखा प्रयोग केला. तेही एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यात केला. टेंभू योजनाचे पाणी आटपाडी तालुक्यात पोहोचले. सर्व तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मानदेशाच्या या डोंगराळ भागातील तलावात हे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत.
तसा संकेत उच्चशिक्षित, मेकॅनिकल पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यशेती करण्याचे ठरवले. कारण संकेतचे वडील शासकीय तलावात टेंडर घेऊन त्यात मत्स्य बीज सोडून उत्पादन घेत होते. पण यात नुकसान जास्त होत होते. तलावातील पाणी वाढले की मासे वाहून जायचे, वेळेवर मासे सापडायचे नाहीत. त्यामुळे शिवाजीराव यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या आधारे आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प करण्याचा निर्णय झाला.
तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्पात जितके बीज टाकले जाईल, तितके उत्पादनाची पूर्ण खात्री आहे. ज्यावेळी दर चांगला असेल तेव्हाच आपण मासे विकू शकतो. मोकळ्या तलावात जसे मासे सापडणे अवघड असते, तसे या प्रकल्पात मात्र आपल्याला जेवढे टन मासे हवेत तेवढे काढू शकतो.
वडील करत असलेल्या व्यवसायामध्ये आधुनिक पद्धतीने काहीतरी करण्याच्या उद्देशाने संकेतने सुरुवातीला पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्पच्या दृष्टीने कोलकाता, भुवनेश्वर येथून प्रशिक्षण घेतले. पुढे 2-3 वर्षे अभ्यास करून मग 4 वर्षांपूर्वी या व्यवसायाचा संकेतने श्रीगणेशा केला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर 6 पिंजरे बनवले. यात वार्षिक 30 टन उत्पादन घेत असताना संकेतने या काळात मासे विक्रीच्या व्यवस्थापनाचा संकेतने अनुभव घेतला आणि नंतर 24 पिंजऱ्याची उभारणी केली.
सध्या या 24 पिंजऱ्यातील माशांसाठी 400 किलो खाद्य लागते. जसजसे मासे मोठे होत जातात, तसे खाद्याची मागणी वाढत जाते. दररोज 20 ते 25 हजार हा फक्त खाद्यावर खर्च होतो. खाद्याची मागणी वाढेल तसे खर्च वाढत जातो. तळ्यात तरंगत्या पद्धतीने असा हा प्रकल्प उभा करणे हे मोठी जोखीम जरी असली तरी या व्यवसायामध्ये अचूक उत्पादनाची गॅरंटी देखील आहे. या पिंजऱ्यात जास्तीत जास्त अडीच किलोपर्यंत मासा तयार होतो. पण साधारण 1 किलोपर्यंत मासा झाला की दर चांगला असल्यास त्याची विक्री केली जाते.
संबंधित बातम्या
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले
कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी, उल्हास नदीला पूर, बदलापुरात पूरस्थिती; ठाणे जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण
Floating aquaculture project erected in the middle of the pond; Experiment of a young man from Sangli