मुंबई : राज्यातील संकटग्रस्त आणि पिडीत महिलांना बळ मिळावे, अडचणीच्या वेळी महिला शक्तीला तात्काळ मिळावी यासाठी शिंदे फडणवीस ( SHINDE – FADNAVIS GOVT. ) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे संकटग्रस्त आणि पिडीत महिलांना केवळ आपली सुरक्षाच करता येणार नाही. तर, महिलांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या विविध शासकीय योजना, सुविधा याबद्दलची माहिती मिळणार आहे. तसेच, महिला ज्या भागात राहते किंवा नोकरी करते त्या परिसरात आवश्यकतेनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि संरक्षण अधिकारी इत्यादींशी संपर्क साधण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘मिशन शक्ती’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. ‘मिशन शक्ती’ योजनेच्या ‘संबल’ या महिलांची सुरक्षा व संरक्षण उपाययोजनेअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या स्तरावरुन ‘१८१’ ही महिला टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेच्या माध्यमातून आणीबाणीच्या सहाय्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS), वन स्टॉप सेंटर (One Stop Centre), १०९८ चाईल्ड लाईन, NALSA हेल्पलाइन, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका इत्यादी सर्व आपत्कालीन आणि गैर-आपत्कालीन सेवा आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (Emergency Response Support System-ERSS) जोडण्यात येणार आहेत. तसेच, सर्व आपत्कालीन सेवा मदत आणि माहिती शोधणाऱ्या महिलांना टोल-फ्री हेल्पलाईन दूरसंचार सेवा २४ तास उपलब्ध रहाणार आहे.
१८१ हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना मानसिक-सामाजिक समुपदेशन, कायदेशीर मदत, सशक्तीकरण आणि विकास (कौशल्य, शिक्षण, आर्थिक समावेशन, उद्योजकता इत्यादींसह) विविध संस्थात्मक आणि योजनाबद्ध सेटअपशी जोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. संकटग्रस्त परिस्थितीत ती महिला किंवा तिच्यावतीने कोणीही या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकणार आहे.
महिलांना कायदे आणि सरकारच्या विद्यमान योजनांबद्दल महिला हेल्पलाईनव्दारे माहिती देण्यात येणार आहे. ज्यांना कोणत्याही परिस्थितीजन्य किंवा शारीरिक आव्हानांमुळे बोलता येत नाही, संवाद साधता येत नसणाऱ्या, श्रवण आणि बोलण्याची कमतरता असलेल्या आणि दिव्यांग लोकांच्या गरजा विचारात घेऊन मजकूर किंवा इतर प्रकारच्या संदेशांद्वारे महिला हेल्पलाईनव्दारे मदत किंवा माहिती दिली जाणार आहे. SAAR IT RESOURCES PVT. L.T.D, मुंबई या संस्थेच्या मदतीने ही महिला हेल्पलाईनव्दारे राज्यात सुरू करण्यात आली आहे.