महेंद्र मुधोळकर, बीड | 4 नोव्हेंबर 2023 : ज्या दिवशी हल्ला झाला त्यावेळी आपले संपूर्ण कुटुंब घरी होते. हल्लेखोर पूर्ण तयारीनीशी आले होते. हल्ला होणार हे दीड तास आधी आम्हाला कळले. हल्लेखोर मराठा आंदोलक नव्हते. त्यांच्या सॅकमध्ये पेट्रोल बॉम्ब होते, त्यांना वाती लावल्या होत्या, पहिली फळी आली ती बीड जिल्ह्यातील नव्हती. दुसरी फळी आली ती बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होती. शिक्षण घेणारी हॉस्टेलमधील मुलं असावीत असा अंदाज आहे. हल्लेखोरांनी घराला क्रमांक दिले होते. माझ्या घराला 22 वा क्रमांक दिला होता. पोलिसांच्या मनात असते तर हा हल्ला रोखता आला असता. या हल्ल्यामागे राजकीय लोक असण्याची शक्यता असल्याचे 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचे एक लक्ष्य ठरलेले माजी आमदार अमरसिंह पंडीत आपली आपबिती सांगत होते.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या घरावरही 30 ऑक्टोबर रोजी हल्ला करण्यात आला होता. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की हल्लेखोर प्रशिक्षित होते. त्यांना बाहेरुन कोणीतरी ऑपरेट करीत होते. ते लोक विचित्र वागत होते, बेधुंद होते. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नव्हते. त्यांच्याकडील सॅकमध्ये वात लावलेले पेट्रोल बॉम्ब होते. फॉस्फरस होते. आम्हाला जीवंत जाळण्याचा त्यांचा उद्देश्य होता. त्यांच्याकडे असलेल्या मारुती स्विफ्ट आणि स्कॉर्पिओ गाड्यांत खडी भरून आणली होती. त्यांचा वापर बॅकअप म्हणून त्यांनी केला होता असे पंडीत यांनी सांगितले.
बीड येथील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत आतापर्यंत 144 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे बीड जिल्ह्यातील आहेत. ग्रामीण भागातील आरोपींचा मोठा समावेश आहे. आरोपी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याप्रकरणात 500 जणांची चौकशी करण्यात आली आहे. अनेक आरोपी फरार आहेत. यातील मास्टर माईंडचा शोध लागला आहे. तो बीडचाच असून त्याला पकडण्यासाठी पाच पथकं तैनात केली आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल असे बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले. प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सुंदर भोसले या आरोपीला अटक केली आहे. भोसले यांनी जमावाला जाळपोळ करण्यात प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे दिला आहे.
लोकप्रतिनिधींचे घर अशा पद्धतीने जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेचा उच्चस्तरीय तपास झाला पाहिजे. आग लागली तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांचे कुटुंब घरात होतं, नशिब बलवत्तर म्हणून कसलीही जीवितहानी झाली नाही. आरोपींना कठोर शासन होईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे हे पोलिसांनी तात्काळ शोधावा आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी तैलिक संघटनेचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. बीड पोलीस निरपराध तरुणांना अटक करीत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यातील मास्टरमाइंड बाजूला सोडून पोलीस दुसरे तरुण आरोपी म्हणून पुढे आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.जिल्ह्यातील जवळपास बारा ग्रामपंचायती संवेदनशील आहेत.