मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. सर्वत्र अजित पवार यांच्या बंडाचीच चर्चा आहे. अजित पवारांनी काल धक्कातंत्राचा अवलंब केला. कोणाला कुठलीही कल्पना लागू न देता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिग्गज नेत्यांना घेऊन गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या बंडाचा फक्त विधिमंडळातच नाही, तर संघटना स्तरावरही फटका बसू शकतो.
अजित पवारांच्या या बंडानंतर विविध पद्धतीने राजकीय विश्लेषण सुरु आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजपाने अजित पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना पर्याय निर्माण केल्याच बोललं जातय.
शिंदे गटात इनकमिंग सुरु
एकनाथ शिंदे यांची वाढती राजकीय ताकद कमी करण्याचा भाग म्हणून अजित पवार यांच्या सरकार प्रवेशाकडे पाहिलं जातय. दरम्यान दुसऱ्याबाजूला शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. ठाण्यात आज पक्ष प्रवेशाचा धडाका आहे.
ठाकरे गटाचा कुठला माजी आमदार शिंदेंसोबत जाणार?
माजी आमदार शिशिर शिंदे आज ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याआधी ते मनसेमध्ये होते. मनसेच्या तिकीटावर ते आमदार झाले. आता हेच शिशिर शिंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी उध्दव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. ठाकरे गटाचे विलास पारकर देखील शिवसेनेत प्रवेश करतील.
मराठी सिनेसृष्टीत कुठले अभिनेते शिवसेनेत प्रवेश करणार?
दरम्यान काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आज शिंदे गटात प्रवेश करतील. हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके हे प्रसिद्ध चेहरे आज शिंदे गटात दाखल होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे हे प्रवेश होणार आहेत.