Virendra Mandlik Contest Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीनतंर आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी रंगताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीतील नेत्यांमध्ये जागावाटपावरुन सतत वाद सुरु आहेत. त्यातच आता कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी घोषणा केली. यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी याचे खापर महायुतीतील नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि तत्कालीन भाजप नेते समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांवर फोडले होते. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंडलिक गटाने स्वतंत्र मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटातील जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश अबिटकर, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह 121 गावांमधील मंडलिक गट आणि शिवसैनिक या मेळाव्यासाठी होते.
आता याच मेळाव्यात संजय मंडलिक यानी वीरेंद्र मडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. गेली 25 वर्ष हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल मतदार संघात अँटी इन्कमबन्सी पसरली आहे. कागल मतदारसंघातील नैसगिक जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे महायुतीतील ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी, असा आग्रह वीरेंद्र मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार आहेत.
यावेळी वीरेंद्र मंडलिक यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. “हसन मुश्रीफ यांनी कायम खेकड्याप्रमाणे माझे पाय ओढले. लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांनीही प्रामाणिकपणे काम केल नाही”, असा गौप्यस्फोटही वीरेंद्र मंडलिक यांनी केला. दहापैकी आठ मतदार मुश्रीफसाहेब नको म्हणतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे मुश्रीफसाहेब तुम्ही आता थांबावे असे आवाहन वीरेंद्र मंडलिक यांनी केले.