नवी मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची घोषणा गेल्यावर्षी केल्यानंतर एसटीचे प्रवासी मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यानंतर एसटी महामंडळाने महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवासाची भेट दिली. त्यामुळे राज्यातील महिलांचा प्रवास सुखाने होत आहे. यातच आता आणखी एका शहरातील विशिष्ट वयोगटातील नागरिकांना मोफत प्रवासाची पर्वणी मिळाली आहे. नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचे मोठे गिफ्ट देण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवास घडविण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमधून मोफत प्रवास करायला मिळणार असल्याने त्यांचा फायदा होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई शहरातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून म्हणजेच 13 नोव्हेंबरपासून एनएमएमटी बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसेसमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीच्या बसेसमधून ज्येष्ठांना मोफत प्रवास देण्याची घोषणा करण्याआधी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी आता एनएमएमटीच्या बसेसमधून 65 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट ( NMMT ) 74 मार्गांवर 567 बसेस चालविते. त्यातून दररोज 1.80 लाख प्रवासी रोज प्रवास करीत असतात. एनएमएमटी केवळ नवीमुंबईतच नव्हे तर मुंबई, बोरीवली, वांद्रे, मंत्रालय, वर्ल्ड ट्रेड सेंटर, अंधेरी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, उलवे, करंजाडे, कारपोली आणि उरण येथे बस चालविते. लवकरच अन्य मार्गांवर ही बसेस चालविण्याची नवीमुंबई महानगर पालिकेची योजना आहे. सध्या नवीमुंबई महापालिका 65 वर्षांवरील नागरिक आणि विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मोफत प्रवास घडविते. लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, पालिका कर्मचारी, अपंग आणि एचआयव्ही बाधितांना मोफत प्रवासाची सोय आहे.