पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला. ठिकठिकाणी आंदोलन झाले. जालन्याला लाठीचार्च झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मावळचा मुद्दा बाहेर काढला. मनोज जरांगे पाटील यांनी समाजहितासाठी उपोषण केलं. सरकारने त्यांना समिती नेमण्याचे आश्वासन दिलं. समिती नेमली पण निर्णय काहीच घेतला नाही अशी टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली.
आता सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली. जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसाची मुदत दिली. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही मुदत दिली. पण, सरकार काहीच निर्णय घेत नाही. समिती स्थापन करून सरकारकडून वेळखाऊपणा केला जात आहे. नारायण राणे यांना असं वक्तव्य करायला भाजपने सांगितलं असेल. दोन समाजात वाद कसा निर्माण होईल हे भाजप पाहत आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. असा निर्णय का घेतला अशी विचारणा होताच फडणवीस यांनी त्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले. 1998 ला पहिल्यांदा जीआर तुम्ही काढला. मग आता बावनकुळे, फडणवीस जनतेची माफी मागणार का? असा थेट सवाल त्यांनी केला.
महायुती सरकार अडीच लाख पदांची भरती करणार होते. मग आता त्याचे काय झालं? सरकारने निर्णय मागे घेतला हा विजय युवकांचा आहे. पण, संघर्ष इथेच संपला नाही. हा लढा सुरुच राहणार. खोटं बोलून. आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना उगीच बोलवून फटाके वाजवायला लावले असे रोहित पवार म्हणाले.
ललित पाटील याला पळून जायचं नव्हतं. पण, कोणत्या नेत्याचा फोन आला म्हणून तो गेला हे ही समोर आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित दादांना अडचणीत आणण्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. फडणवीस यांना निधी थांबविण्याचा अधिकार नाही. तरीदेखील निधी थांबवला हात आहे. अजित दादा यांच्या खात्यात हस्तक्षेप केला जातोय, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.