नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीने काढलं चित्रा वाघ याचं ‘मातृत्व’, कुणी केली जळजळीत टीका?

| Updated on: Oct 12, 2023 | 7:02 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नांदेडच्या घटनेबाबत खळबळजनक विधान केले होते. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर जळजळीत टीका केलीय. एखाद्या गोष्टीवरचं लक्ष वळवण्यासाठी भाजपची पद्धत आहे आणि तेच चित्रा वाघ करत आहेत, असा टोलाही या नेत्याने लगावला.

नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीने काढलं चित्रा वाघ याचं मातृत्व, कुणी केली जळजळीत टीका?
SUPRIYA SULE, ROHINI KHADSE, CHITRA WAGH
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

जळगाव : 12 ऑक्टोबर 2023 | भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्याची ही टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगलीच झोंबलीय. नांदेड येथील घटनेवर चित्रा वाघ यांनी विधान केले होते. त्या विधांची आठवण करून देत राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जळजळीत टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या मोठ्ठ्या ताई सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? असा टोला लगावला. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री त्यांना आवडणार नाहीच. ससून प्रकरणात 9 पोलिस निलंबित झाले. हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या पण तेही तुम्हाला आवडले नसेल. कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग, ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.

चित्रा वाघ यांनी केलेल्या याच टीकेवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. चित्रा वाघ यांनी नांदेड रुग्णालयात औषधी पुरवली होती. मात्र, औषधे आम्ही त्यांच्या घशात घालायला हवी होती का? असं वक्तव्य नांदेड येथील घटनेवर बोलताना केलं होतं. त्यामुळे घशात औषधी घालण्याचे वक्तव्य करणाऱ्या चित्रा वाघ यांच मातृत्व हरपले का? असा जळजळीत सवाल रोहिणी खडसे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

चित्रा वाघ ह्या महान नेत्या आहेत. पण, त्या एक महिला आहेत ही गोष्ट त्या विसरल्या आहेत. चित्रा वाघ यांच्यातले मातृत्व हरपले आहे का? या सरकारमध्ये वीजपुरवठा, शेतकऱ्यांना पिक विमाचे पैसे मिळत नाही. महिला सुरक्षित नाही. त्यामुळे राज्यात आनंदात नेमकं कोण आहे? आनंदाच्या शिधाचं जे वाटप केलं जात आहे त्यात नेमकं आनंदी कोण? असे सवालही रोहिणी खडसे यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.

एखाद्या गोष्टीवरचं लक्ष वळवण्यासाठी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करण्याची भारतीय जनता पार्टीची ही पद्धत आहे आणि तेच चित्रा वाघ करत आहेत. उलट चित्रा वाघ या सरकारमध्ये आहेत. त्यांनी नांदेड येथील घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असाही टोलाही रोहिणी खडसे यांनी लगावला.