गडचिरोली/व्यंकेटेश दुडमवार : जिल्ह्यातील आलापल्ली येथून अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी मौल्यवान सागवान पाठवण्यात येत आहे. मात्र गडचिरोलीचे सागवान आणि शोभायात्रा मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात काढण्यात येत असल्यामुळे काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गडचिरोली प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शासनाकडून 3 कोटी रुपये खर्च करून चंद्रपूर जिल्ह्यात गाजावाजा करत शोभायात्रा काढण्यात येत आहे.
जर हाच निधी गडचिरोली जिल्ह्याला देऊन याच ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली असती तर या कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी होऊन या शोभायात्रेचा मान ठेवला असता,
मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील मौल्यवान सागवान काष्ठ बल्लारपूर येथे घेऊन जाऊन वनमंत्र्यांनी स्वतःच्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो आम्ही खपवून घेणार नसल्याचेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
एवढेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येथील लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय असल्यामुळे हा निधी चंद्रपूर जिल्ह्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार पदाचा दुरूपयोग करून ही निधी चोरून घेऊन गेले का असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिराबरोबर गडचिरोली जिल्हा वासियांची भावना जुळली आहे. कारण गडचिरोली जिल्ह्याचा सागवान असल्यामुळे काष्ठ पूजा,आरती आणि शोभायात्रा काढण्याचा अधिकार आमचा होता.
मात्र,हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जंगलाची रक्षण आम्ही करत आहोत.
तसेच जंगल सुरक्षित राहण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जेव्हा आमच्या जंगलातून आमचा सागवान घेऊन जात असताना हा उत्सव साजरा न करू देणे हा आमचा भावना दुखणारा निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावला होता या परिस्थितीतही या जंगलाची सुरक्षा येथील जिल्हावासीयांनी केली आहे.
मात्र नक्षलवादाचे दुष्परिणाम मात्र जिल्हावासीयांनी भोगले आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. आणि जेव्हा उत्सव साजरा करायचा आहे तेव्हा गडचिरोली जिल्ह्यात न करता तो इतर भागात करायचा असा कट भाजप करत असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.