होर्डिंग पडलं हे तर देवाचं कृत्य… घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा अजब तर्क; जामिनासाठीच्या याचिकेतील युक्तिवाद काय?

| Updated on: Jul 18, 2024 | 11:44 AM

घाटकोपर होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घटना 'ॲक्ट ऑफ गॉड' आहे. त्यामुळे आपल्या विरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करून जामीन द्यावा अशी मागणी या घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे यांनी केली आहे.

होर्डिंग पडलं हे तर देवाचं कृत्य... घाटकोपर दुर्घटनेतील आरोपीचा अजब तर्क; जामिनासाठीच्या याचिकेतील युक्तिवाद काय?
Follow us on

मे महिन्यात मुंबईतील घाटकोपर परिसरात घाटकोपर कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. 13 मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले. याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला दोन दिवसांनी अटक करण्यात आली होती. दरम्यान भावेश भिंडे याने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. होर्डिंग कोसळल्याची ही दुर्घटना म्हणजे देवाचे कृत्य, ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असल्याचा अजब युक्तिवाद भिंडे याने केला आहे. आपली अटक बेकायदेशीर ठरवत त्याने जामीनाची मागणी केली आहे. तसेच माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआरही रद्द करण्यात यावा अशी मागणीदेखील भिंडे याने केली आहेय

काय आहे प्रकरण ?

घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळून लोक दगावले, ते इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असून भावेश भिंडे त्याचे संचालक आहेत. यामुळे त्याला दुर्धटनेस जबाबदार ठरवून पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता भावेश याने अटकविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. 13 मे रोजी ही दुर्घटना घडली, त्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 80 जण जखमी झाले. मात्र ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी मला जबाबदार धरू नये, असा दावा भावेश भिंडे याने केला.

भिंडेंचा दावा काय ?

भिंडे यांनी होर्डींग कोसळण्याचे श्रेय देवाच्या कृतीला दिले. तसेच त्यांनी त्यांनी 12 मे रोजी जारी केलेल्या भारतीय हवामान खात्याच्या बुलेटिनचा हवालाही दिला. ज्यात त्यांनी निदर्शनास आणून दिले की, दुसऱ्या दिवशी (१३ मे)मुंबईत जोरदार वाऱ्यासह धुळीच्या वादळांचा अंदाज लावण्यात हवामान खात्याला अपयश आलं. परंतु, 13 मे रोजी दुपारी 4:15 च्या सुमारास, मुंबईत धुळीचे वादळ आलं आणि 60 किमी प्रतितास ते 96 किमी प्रति तास या वेगानं वाऱ्याचा तडाखा बसला, जे अत्यंत असामान्य होतं आणि यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. आयएमडीनं पुष्टी केली होती की, बीएमसीच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवलेल्या वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी होर्डिंगवर परिणाम करत होता.

वाऱ्याच्या वेगामुळेच होर्डिंग कोसळलं, पण एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बांधकामात निष्काळजीपणा केल्यामुळे होर्डिंग कोसळलेलं नाही, असंही भिंडे यांच्या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. हे होर्डिंग पडण्यास ‘देवाची कृती’ अर्थात ‘ॲक्ट ऑफ गॉड’ कारणीभूत होती आणि हा एक दुर्दैवी अपघात होता. त्यामुळे यासाठी याचिकाकर्ता (भिंडे) किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.