स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार? गिरीश महाजनांचा मोठा खुलासा

| Updated on: Feb 15, 2025 | 5:40 PM

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार? गिरीश महाजनांचा मोठा खुलासा
Follow us on

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे, भाजप देखील स्वबळावर निवडणूक लढू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन? 

स्वबळाचा नारा मी अजून दिलेला नाही, मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकू शकते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल, मित्र पक्षही आमच्यासोबत असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येण्याची शक्यता आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद कायदा हा लागू झालाच पाहिजे. आठ राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील नारज असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तिकडे एकाच माणसाला संधी आहे, ते म्हणजे संजय राऊत, क्षमतेपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी बोलत आहेत. क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत. बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.