गोंदिया जिल्ह्यात पुरामुळे 12 हजारावर हेक्टर शेती जमिनीवर लावण्यात आलेल्या धान पिकाचे नुकसान झालं. आमदार विनोद अग्रवाल यांनी बांधावर जाऊन केली नुकसान ग्रस्त शेती तसेच घरांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पाऊस व आलेल्या पुरामुळं 12 हजार हेक्टर शेत जमिनीवर लावण्यात आलेल्या पिकांचे नुकसान झाले. याच नुकसानग्रस्त शेताची पाहणी गोंदिया विधानसभा (Gondia Assembly) क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी केली. कृषी विभागासोबत (Department of Agriculture) पाहणी करीत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत. बसून आढावा घेणारे बरेच लोकप्रतिनिधी आहेत. पण, बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणारे फार कमी असतात. या शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर मदत मिळेल, अशी अपेक्षा विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केली.
गोंदिया जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्याअंतर्गत येणाऱ्या 666 गावातील 22 हजार 185 शेतकऱ्यांना बसला. यात तब्बल 12 हजार हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिसकावला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी हाक शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी तसेच शासन दरबारी लावली आहे. दुसरीकडे आता कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे करायला सुरवात केली आहे. अशी माहिती शेतकरी तुलेश्वर कटरे व कृषी अधिकारी हिंदुराज चव्हाण यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिना हा नैसर्गिक आपत्तीचा महिना ठरला. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या पावसाच्या थैमानाने तब्बल जिल्ह्यातील 12 हजार हेक्टरवरीर धानपीक निस्तनाबूत झाले आहेत. दुबार पेरणीचीही वेळ निघून गेली. 22 हजार 185 शेतकऱ्यांवर कपाळावर हात मांडण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती कसली. मात्र पुरानेही ती वर्षभराची पुंजी हिरावून घेतली.