गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पालांदूर/जमीनदारी (Palandur -Zamindari) येथून पाच किलोमीटर अंतरावर चुमली गाव आहे. चुमली या गावी परत जात असताना पुन्हा एका व्यक्तीचा नदीतील पाण्याचा प्रवाहात वाहून जीव गेला. ही दुर्दैवी घटना काल घडली. विशेष की दहा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार यांनी गावाला भेट दिली. नागरिकांना आश्वासन दिले होते. ही घटना घडली असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याकडं स्थानिक आमदारांनी लक्ष वेधलं. गावात जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन गेले. प्रशासकीय चमून पाहणी केली. व्यवस्था करण्याची गावकऱ्यांची मागणी लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन प्रशासनानं (Administration) दिलं. पण, काल पुन्हा एक नागरिकाचा नदीनं बळी घेतला. या गावात जाण्यासाठी रस्ता खडतर आहे. पुलाची व्यवस्था नाही. त्यामुळ नदी ओलांडून गावात प्रवास करावा लागतो. हा जीवघेणा प्रवास (Fatal Journey) केव्हा संपणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
देवरी तालुक्यातील पालांदूर/जमीनदारीपासून चुमली गावाला जाण्याकरिता रस्ता आणि नदीवर पुल नाही. गावात जाण्यासाठी चुमली नदी ओलांडूनच गावातील नागरिकांना अनेक वर्षापासून ये-जा करावे लागत आहे. यामुळे सतत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पर्यायी व्यवस्था नसल्याने काहींचे जीव या चुमली नदीत गेले आहेत. याचीच दखल घेत काही दिवसा अगोदरच जिल्हाधिकारी व संपूर्ण जिल्हा प्रशासनाने चुमली गावातील नागरिकांची भेट घेतली. नदीची पाहणी करत लवकरच नागरिकांना ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काल पुन्हा चुमली गावातील एका व्यक्तीचा त्या नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव मोरेश्वर देवाजी सलामे (वय 38) वर्षे राहणार चुमली आहे. हा व्यक्ती पालांदुर/जमीनदारीवरुन चुमली गावी परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद चिचगड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल सरपंच देवविलास भोगारे यांनी दुःख व्यक्त केलं.