गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) भारतीय जनता पक्षाची सत्ता बसण्याचा मार्ग सुकर झालाय. दोन्ही अपक्ष उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गोंदिया जिल्हा परिषदेत 10 मे रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक (Election) होणार आहे. 53 जागांपैकी भाजपने 26 जागा जिंकल्या. मॅजिक फिगर गाठण्यासाठी 1 सदस्यांची गरज होती. अपक्ष उमेदवारी लढलेले पोर्णिमा ढेंगे, सोनू कुथे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले होते. दोन दिवसांपूर्वी गोंदिया पंचायत समितीप्रमाणे (Gondia Panchayat Samiti) नवीन समीकरण निर्माण होणार असा अंदाज व्यक्त होत होता.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष उमेदवार यांची सत्ता स्थापन होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, दोन्ही अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांनी भेट घेतल्याची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोर्णिमा ढेंगे, सोनू कुथे या दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ते दोघेही भाजपला पाठिंबा देतील. त्यामुळं गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता प्रस्थापित होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत 10 मे रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
53 जागांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यापैकी 26 जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेस 13, चाबी 4, राष्ट्रवादी 8, अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यानं कोणता पक्ष जिल्हा परिषदेत सत्तेत बसेल, याची चर्चा सुरू होती. पण, दोन अपक्ष भाजपच्या खेम्यात गेल्यानं आता भाजपचा मार्ग सुकर झालाय.