मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली (Savartori) येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येणार आहे. यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी (Director General of Police) देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.
मदतीचे आश्वासन देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. अत्याचारानंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आली. तिच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी फरार आहे. तर दूसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदिया पोलिसांना वर्ग केला आहे.
पीडित महिला ही पतीपासून विभक्त राहते. गोंदियातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती भंडारा जिल्ह्यात आईकडे जाणाच्या बहाण्याने निघाली. संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कर मध्ये बसवत गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला पाशवी अत्याचार केला. तर दुसऱ्या दिवशी 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. यावेळी आरोपीने तिथून पळ काढला. दरम्यान, पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह येथे पोहचली. कन्हाळमोह गावाजवळ असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली. तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोनसोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्या मित्रासोबत 1 ऑगस्ट रोजी तिला मदतीच्या बहाण्याने पाशवी अत्याचार केला. अत्याचारानंतर कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता दरम्यान विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला.