गोंदिया : गोंदिया शहरात एका योजनेचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याशिवाय या योजनेच्या कामात एका जणाचा बळी गेला. त्यामुळे या प्रकरणाची दखल मुख्य अभियंता यांनी घेतली. या कामाची स्वतः पायी फिरून पाहणी केली. काम समाधानकारक नाही. त्यामुळे याची १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता म्हणाले.
गोंदिया शहरात 134.7 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना मंजूर झाली. त्या योजनेचे काम मागील दोन वर्षापूर्वी सुरू झाले. मात्र कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी आहेत. कामदेखील निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामामुळे एका मजुराला आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.
अनेक लोकांचे अपघातही झाले आहेत. शहरातील अनेक रस्ते या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे फोडण्यात आली. मात्र रस्ता दुरुस्तीच्या नावावर बोगस काम केल्याने अनेक जागी खड्डे पडले आहेत. अनेक रस्ते निष्कृष्ट दर्जाचे बनविण्यात येत आहेत.
वारंवार तक्रार करून देखील काम करणारी लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे शहरातील जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकारी, यांची भेट घेत निवेदन दिले. तत्काळ कामांत सुधारणा करण्याची विनंती केली आहे.
याची तक्रार जिल्हा अधिकारी यांना केली. तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राज कटपल्लीवार यांनी गोंदिया येथे आले. शहरात सुरु असलेले भूमी गटार कामाचे निरीक्षण केले. स्वतः पायी फिरत कामाचा आढावा घेतला.
काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे कॅमेऱ्यासमोर म्हणाले. तर येत्या 15 दिवसात याबद्दल अहवाल सादर करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता राज कटपल्लीवार यांनी दिली. त्यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहे. या कामात कमिशनखोरीची लागण झाल्याचे दिसून येत आहे.