गोंदिया : एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना वारेमाप पगार मिळतो. त्यापैकी काही जण दोन नंबरचे पैसे कमवतात. पण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळते. तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे या कंत्राट कर्मचाऱ्यांमध्ये कधी-कधी असंतोष जाणवतो. याच असंतोषाचा भडका गोंदियात उडाला. राकेश यशवंत बोरकर या शिपायाच्या रुपाने हा भडका उडाला. राकेश हा आमगाव येथील तहसील कार्यालयात शिपाई आहे. त्याला फारच कमी पगार मिळतो. या कार्यालयात तहसीलदार म्हणून मानसी पाटील काम करतात. राकेशला गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळं घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्याला पडला. त्यासाठी त्याने संबंधितांना विचारणा केली. पण, योग्य उत्तर मिळालं नाही.
आपण काहीतरी हटके केल्याशिवाय वेतन मिळणार नाही, असं राकेशला वाटलं. त्यामुळे त्याने लक्ष वेधण्यासाठी एका झाडाचा आधार घेतला. झाडावर चढला. तिथून उडी मारून जीव देण्याची धमकी राकेशने दिली. पण, त्याला कोणी भीक घातली नाही. शेवटी तो झाडावरून खाली उतरला. आता दुसरं काहीतरी करावं लागेल, अशी खूणगाठ त्याने बांधली. तो तहसील कार्यालयातील बाथरूममध्ये शिरला. स्वतःला कोंडून घेतले. त्यामुळे कर्मचारी घाबरले. त्याने काही कमीजास्त केलं तर आपल्यावर येईल, अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवलं.
आमगावचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मोठ्या शिताफीने राकेशशी संवाद साधला. त्याला शांत करत बाथरूमचा दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार झाला. पण, राकेशच्या वेतनाचा प्रश्न सध्यातरी काही मिटला नाही. आश्वासनाची खैरात त्याच्यावर सोडण्यात आली. सरकारी काम सहा महिने थांब, अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली. त्यामुळं घरचं कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न त्याला पडला आहे. राकेशला शांत करण्यात पोलिसांना यश आलं. पण, वेतन मिळालं नाही तर पुन्हा त्याच्या भावनांचा बांध नक्की फुटणार आहे. त्यावेळी काय होईल, याची खबरदारी घेऊन योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.