गोंदिया जिल्ह्यात एका बाजूला अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. तर दुसऱ्या बाजूला काही गावांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा बसत असून पाणी टंचाईने टोक गाठलं आहे. असंच एक गाव गोंदिया तालुक्यातील बिरसी… येथे ब्रिटिशकालीन विमानतळ होतं. ते विमानतळ आता नवीन स्वरूपात आलं. या ठिकाणी गोंदियातील विमानतळ तयार झालं आणि त्यामुळेच या विमानतळाच्या नजीक असलेल्या नागरिकांना पुनर्वसित करण्यात आलं. गावातील जवळपास 106 कुटुंब पुनर्वसित करण्याचा निर्णय शासनाने दिला. त्या ठिकाणी 106 कुटुंब आपापले घर बांधून राहत आहेत. पण अद्यापही या गावांमध्ये मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अती मूलभूत सोयी मिळाल्या नाहीत. तर या ठिकाणी पाण्यासाठी महिलांसह मुलांना पायपीट करावी लागत आहे.
बिरसी विमानतळामुळे पुनर्वसित झालेला 106 कुटुंब या गावाजलगतच घर तयार करून राहतात. पण हे गाव तयार झालं असून सुद्धा शासनाने अद्यापही या गावांना मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत. याबाबत अनेक तक्रारी या गावांमधून नेहमीच येत असतात. आता सध्या उन्हाळा सुरू असून या उन्हाळ्यात अत्यावश्यक म्हणजे पाणी… गावकऱ्यांना पाण्यासाठी या 500 मीटरपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. त्यातही पाणी हे पिण्यास योग्य नसल्याची तक्रार गावकऱ्यांची आहे.
पिण्यास योग्य पाणी या गावाला मिळत नसल्याने त्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. शासनाकडून एका बाजूला जल स्वराज मिशन अंतर्गत सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना आखली आहे. पण बिरसीवासियांना स्वच्छा पाणी मिळत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे
महिलांना रोज सकाळी पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायी जाऊन पाण्याची व्यवस्था करावी लागते. इतकी पायपीट करुनही गढूळ पाणी असतं. हे पाणी धूनीभांडी करण्याच्या कामात येतं आणि पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक पैसे खर्च करून वाटर कॅनचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गावातील पाण्याचा प्रश्न जर असाच बिकट राहिला तर येणाऱ्या दिवसात मात्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे.