तिरोडा, गोंदिया | 27 डिसेंबर 2023 : दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते आहे. अशातच एक भीषण अपघात समोर आला आहे. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला आहे. तवेरा गाडीला भीषण अपघात झालाय. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सहा जण गंभीर रित्या जखमी झालेत. या मृतांमध्ये दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. लग्नाची वरात घेऊन जात असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नासाठी निघाले असता हा अपघात झाल्याने परिसर हळहळला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या एकोडी दांडेगाव इथं तवेरा गाडीचा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यु झाला. यात दीड वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर पाच ते सहा प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तिरोडा तालुक्यातील करटी बुजूर्ग इथं लग्न समारंभानिमित्त वऱ्हाडी तवेरा गाडीने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी इथं जात होते. यावेळी दांडेगावच्या चौकात ही घटना घडली. या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर गंगाझरी पोलीस घटना स्थळी झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
कालही असाच भीषण अपघात झाला होता. बसमध्ये खचाखच प्रवासी भरून शेगाव स्थानकातून जळगाव जामोदकडे जाणार्या एसटी बसचे कालखेड फाट्याजवळ ऍक्सल तुटून अपघात झाल्याची घटना घडली. एक्सलेटर तुटल्याने बसची मागची दोन्ही चाकं निखळून बाहेर पडली. मात्र , अशा परिस्थितीतही सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. बसमध्ये 90 ते 100 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. एस टी बस प्रवाशांनी खचाखच भरून शेगांववरून जळगाव जामोदकडे निघाली होती. तेव्हा असता वाटेत कालखेड फाट्याच्या जवळ पोहोचल्यानंतर अचानक बसचं एक्सलेटर तुटलं. यामुळे अपघात झाला.