गोंदिया : ग्रामपंचायत असो की, जिल्हा परिषद दाम करी काम अशी परिस्थिती आहे. सरकार विकासकामांसाठी पैसे देते. त्यातील पैसे काढण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सह्या लागतात. त्यासाठी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये पाच टक्के हे सरपंच आणि पदाधिकारी यांना दिले जातात. तर पाच टक्के हे ग्रामसेवकांना दिले जातात. त्यानंतर कुठं ठेकेदारांचे बील काढले जाते. ग्रामपंचायत पदाधिकारी जेव्हा काम बीडीओंकडून खेचून आणतात. तेव्हा त्यांनाही टक्केवारी दिल्याशिवाय ते मंजुरी देत नाही, असं काही सरपंच खासगीत सांगतात. हे सर्व पैसे कसे मॅनेज करायचे, यासाठी भ्रष्टाचाराला शिष्याचार केला जात आहे.
अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असे मिळून लोकप्रतिनिधी आणि सरकारी बाबू ठेकेदारांकडून टक्केवारी वसूल करतात. कधीकधी ठेकेदाराला काम परवडत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे करावे लागते. कधीकधी काही ठेकेदार टक्केवारी देण्यास नकार देतात. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या जातात. त्यापैकी काही जण जाळ्यात अडकतात. अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यामुळे एकच खडबड माजली आहे. यात वडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती रीना हेमंत तरोने (वय 32 वर्षे) यांच्यासह तीघांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली. यात उपसरपंच सुनील मुनेश्वर (वय 27 वर्षे), ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मन्साराम मेंढे (वय 38 वर्षे) आणि लोपा विजय गजभिये (वय 50 वर्षे यांचा समावेश आहे. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक आहेत. त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचायत वडेगाव येथे 2020-21 मध्ये ग्रामपंचायत निविदेनुसार विविध कामांकरिता बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. तक्रारदार ठेकेदार यांनी पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याचे मंजूर बिलाचे चेक देण्याकरिता गैरअर्जदार यांनी 15 लाख 55 हजार 696 रुपयांच्या धनादेशावर सह्या करण्यासाठी 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 70 हजार रुपयांची लाच घेताना सापडले. आरोपी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वताच्या लाभाकरिता गैरवाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एक आरोपी फरार आहे.