गोंदिया : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. आता धान लोंबीवर आला आहे. परंतु, लोंबी भरत नसल्याने शेतकरी परेशान आहेत. साकोली तालुक्यातील आतेगाव येथेही धानाच्या लोंबी भरत नाहीत. त्यामुळे शेतकरी औषधाची फवारणी करतात. पण, यातूनही काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भास्कर हटवार यांनी केली आहे. वातावरण बदलाचा परिणाम तसेच रासायनिक खतांचा वापर वाढत असल्याने किडी औषधाला जुमानत नसल्याची परिस्थिती आहे.
सततचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे रब्बीच्या धान पिकांवर खोडकिडिसह इतर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला. अल्पावधीतच अवघे शेत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून पंचनामे करावे. नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भजेपार ग्राम पंचायतीने सालेकसाचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बाघ प्रकल्पातील सिंचन आणि खासगी जलस्त्रोत यांच्या माध्यमातून भजेपारसह सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बीच्या धान पिकाची लागवड केली. पिके जोमाने वाढत असतानाच आता मागील काही दिवसांपासून होत असलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रचंड प्रादुर्भाव वाढलेला आहे.
भजेपार येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे लोंब सुकून पांढरे पडले आहे. जवळपास 80 टक्क्यांवर अनेकांचे नुकसान झाले आहे. रोगाचा प्रादुर्भाव एवढा प्रचंड आहे की, एक दोन दिवसातच संपूर्ण शेत उद्ध्वस्त होत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारून धानाची जपणूक केली. परंतु आता औषधाचादेखील किडींवर परिणाम होताना दिसत नाही.
ऐन कापणीवर धान येण्याच्या आधीच हातचे उत्पादन गेल्याने तोंडचा घास गेल्याची प्रचिती आली आहे. पिकांची झालेली प्रचंड हानी आणि यातील गंभीरता प्रशासनाच्या लक्षात यावी म्हणून चक्क रोगाने प्रभावित धानाचे रोपटे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देतेवेळी दाखवण्यात आले.
या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करावे. नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, रघुनाथ चुटे, विवेक मेंढे आणि मुकेश पाथोडे यांनी केली आहे.