गोंदिया : रायपूरकडून निघालेली भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस ही साप्ताहिक ट्रेन रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी गोंदिया रेल्वे स्थानका आधी असलेल्या चुलोद गावाजवळ असलेल्या रेल्वे फाटक जवळ पोहचली. भगत की कोठी या रेल्वे प्रवासी गाडीला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे ती समोर निघाली. मात्र काही मिनिटाआधी याच रेल्वे फाटकावरून निघालेल्या माल गाडीला अचानक रेड सिग्नल मिळाल्याने ती समोर जाऊन थांबली. मागून येणाऱ्या भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस या रेल्वे गाडीने मालगाडीला धडक दिली. भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस (Bilaspur Express) या रेल्वे गाडीचा एस 3 डब्बा रेल्वे रुळाखाली उतरला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मात्र घडलेला अपघात हा चुकीचा सिग्नल मिळाल्याने झाला असल्याची माहिती आहे. बिलासपूर झोनचे मंडळ रेल प्रबंधक अलोक कुमार (Alok Kumar) यांनी दिली तर अपघाताची तीव्रता बघता नागपूर रेल्वे डीआरएम मणिंदर सिंग उत्पल (Maninder Singh Utpal) यांनी देखील घटना स्थळी येत भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत.
घडलेला अपघात इतका भीषण होता की ट्रेनमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन वयोवृद्ध लोकांना हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला. उर्वरित लोकांना रेल्वे विभागाच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस याच रेल्वे गाडीने पुढे पाठविले. हा रेल्वे अपघात मुंबई हावडा रेल्वे रुळावर घडल्याने या ठिकाणची रेल्वे वाहतूक काही तासातच युद्ध पातळीवर कार्य करीत पूर्ववत करण्यात आली. मात्र हा अपघात मानवीदृष्ट्या नवे तर तांत्रिक चुकीमुळे घडल्याने याची योग्य चौकशी करु असे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.
रायपूरच्या दिशेने नागपूरकडे जाणाऱ्या भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीला अपघात झाला. गोंदिया रेल्वे स्थानकाआधी असलेल्या चुलोद गावाजवळ ही दुर्घटना घडली. चुकीचा सिग्नल मिळाल्याने अपघात घडला. एकाचं रेल्वे रुळावर चालत असलेल्या मालगाडीला भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस या रेल्वे गाडीने मागून धडक दिली. भगत की कोठी या रेल्वे गाडीचा एस 3 हा डबा रेल्वे रुळा खाली उतरला. दोन प्रवासी जखमी झाले. तर दोन वृद्ध प्रवाशांना हृदय विकाराचा त्रास जाणवत होता. त्यांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.