गोंदिया : व्याघ दर्शनासाठी गोंदिया जिल्ह्यातील नावेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्प (Tiger Project) परिचित आहे. व्याघ संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी (Bramhapuri) येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडण्याचा निर्णय झालाय. राज्याच्या वनविभागाने (Forest Department) हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ प्रकल्पात सोडण्याचे संकेत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिले. नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे येथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले.
या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्यात ठेवण्यात येईल. मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत आहेत. स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वाघांचा जंगलात एक विशिष्ट प्रदेश असतो. हे वाघ नवीन आल्यावर त्यांना स्वतःचा प्रदेश तयार करावा लागेल. तसंच नागझिरा जंगलात वाघांची संख्या कमी आहे. ब्रम्हपुरी, ताडोबात वाघांनी धुमाकूळ घातला आहे. एकदोन दिवसाआड एखाद्या व्यक्ती वन्यप्राण्यांच्या शिकारीचा बळी पडत आहे. अशावेळी नवीन जंगलात सोडल्यास त्यांना जंगलात प्रमाणात खाद्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळं समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. वाघ बघायचा असेल, तर सध्या ताडोबाची ज्यास्त क्रेझ आहे. नागझिऱ्यात येणाऱ्या पर्यटकांची निराशा होते. पण, या वाघिणी येथे आल्यानंतर पर्यटकांची निराशा होणार नाही, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.