नागपूरवरून गावी परतणाऱ्या बापलेकांवर काळाचा घाला, ट्रकने दुचाकीला चिरडले

| Updated on: Jun 24, 2023 | 7:30 PM

लोहारा येथील सेवकराम पोगळे आणि सुनील पोगळे हे दोघेही कामानिमित्त नागपूरला गेले होते. तिथून ते गावाकडे परत येत होते. तेवढ्यात हा भीषण अपघात झाला.

नागपूरवरून गावी परतणाऱ्या बापलेकांवर काळाचा घाला, ट्रकने दुचाकीला चिरडले
Follow us on

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : राष्ट्रीय महामार्ग चकाचक झाले. यामुळे वाहनचालक सुसाट गाड्या चालवतात. अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अपघातात ठार होणारे हे वेगाचे बळी ठरत आहेत. असाच एक अपघात आज देवरीजवळील डोंगरगाव येथे घडला. या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गावाकडे परतताना अपघात

लोहारा येथील सेवकराम पोगळे आणि सुनील पोगळे हे दोघेही कामानिमित्त नागपूरला गेले होते. तिथून ते गावाकडे परत येत होते. तेवढ्यात हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांच्याही शरीराच्या चिंधड्या उडाल्या.

 

लोहारा येथील दोन जण ठार

गोंदिया जिल्ह्यातून मुंबई – हावडा राष्ट्रीय महामार्ग जाते. या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देवरीजवळील डोंगरगाव या गावाजवळ अपघात झाला आहे. या आपघातात देवरी तालुक्यातील लोहारा येथील दोन जण ठार झाले.

ट्रकच्या धडकेत दुचाकी चिरडली

सुनील पोगळे (वय 35 वर्षे) आणि सेवकराम पोगळे (वय 60 वर्षे) अशी मृतकांची नाव आहेत. हे नागपूरवरून आपल्या स्वगावी लोहारा येथे येत होते. भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. ट्रकच्या धडकेत दुचाकी चिरडली गेली. त्यामुळे भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात एवढा भयंकर होता की त्यांच्या शरीराचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते. या अपघाताला कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न पडला होता. एकीकडे ट्रकचालक, तर दुसरीकडे खुला असलेला राष्ट्रीय महामार्ग या दोघांचा हे दोन जण बळी ठरले.

पाटस येथील अपघातात युवक ठार

दुसरा अपघात, पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडीजवळ घडली. शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या आसपास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक नेहल अप्पासाहेब गावडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.नेहल हा २६ वर्षांचा होता. तो पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील रहिवासी होता.

संतप्त गावकऱ्यांनी कार पेटवली

या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला. मर्सिडीज कारमधील एक जण जखमी झाला आहे. या अपघातात गावामधील दुचाकीस्वार मृत्यूचा झाला. त्यानंतर बिरोबावाडीमधील संतप्त गावकऱ्यांनी मर्सिडीज कार पेटवून दिली. त्यामुळे काही काळ अष्टविनायक मार्गावरील दौंड पाटस वाहतूक थांबविण्यात आली होती.