दिवाळीत ग्राहकांना दिलासा ! 25 रुपये किलो दराने मिळणार कांदा, कल्याण-डोंबिवलीत नाफेडकडून सवलतीत होणार विक्री

| Updated on: Nov 13, 2023 | 10:52 AM

कांद्याचा भाव स्थिर ठेवण्यासाठी आणि जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. आता नागरिकांना एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दराने कांदा विकला जाणार आहे

दिवाळीत ग्राहकांना दिलासा ! 25 रुपये किलो दराने मिळणार कांदा, कल्याण-डोंबिवलीत नाफेडकडून सवलतीत होणार विक्री
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 13 नोव्हेंबर 2023 : सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच यंदा दिवाळीत कांद्याचा भावही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र आता कांद्याचा भाव स्थित ठेवण्यासाठी आणि जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. कल्याण- डोंबिवली सह इतर शहरांमध्ये सवलतीच्या दरातील 100 ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेला थोडा तरी दिलासा मिळेल. मात्र सरकारच्या या योजनेमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

मोबाइल व्हॅनद्वारे होणार कांदा विक्री

ऐन दिवाळीत कांद्याचे भाव कडाडले कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आता जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. त्याअंतर्गत आता नागरिकांना एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दराने कांदा विकला जाणार आहे. त्यासाठी येत्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या ठिकाणी सवलतीच्या दरातील 100 ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

दिवाळीत भाज्यांचे दर कडाडले असताना, नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरातील विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते. नागरिकांना महागाईची झळ बसू नये या उद्देशातून या माध्यमातून भारत चणाडाळ, भारत आटा व कांदा विक्री केंद्र माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला जाणार आहे. मात्र सरकारच्या या योजनेमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सध्या कल्याण बाजारपेठेत 40 ते 45 रुपयाने कांदा दिला जात असून सरकारच्या या भूमिकेमुळे ग्राहकाला दिलासा तर मिळेल मात्र क्वॉलिटी मिळणार नाही असे मत मांडत कांद्या विक्रेत्यांनी व्यक्त केले असून खंतही व्यक्त होत आहे.