मुंबई : समाजात मुलं दत्तक ( adoption ) घेण्याचे प्रमाण समाजात तसं फारच कमी आहे, त्यासाठी मोठं हृदय लागतं, परंतू हळूहळू बदल होत आहे. एसटी महामंडळाने अनोखा निर्णय घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एसटी महामंडळ ( MSRTC ) आता प्रसुती रजे प्रमाणे दत्तक मुल घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा देणार आहे. मात्र असे करताना महामंडळाने अटी भरपूर टाकल्या आहेत. एसटी महामंडळात एकूण पाच हजार महिला कर्मचारी आहेत. त्यापैकी खालील अटी व शर्थी पाळणाऱ्या महिलांना या रजा मिळणार आहेत.
राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी एक वर्षांच्या आतील मूल दत्तक घेतल्यास महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची भरपगारी विशेष रजा देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर आता एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनाही विशेष रजा लागू होणार आहे. एसटीमध्ये 88 हजार कर्मचारी आहेत. त्यात 4,400 महीला कंडक्टर आणि इतर कर्मचारी मिळून एकूण पाच हजार महिला कर्मचारी आहेत. एसटीची नोकरी तशी धकाधकीची आहे. त्यात चालकांची ड्यूटीतर अधिकच जोखमीची आहे. त्यामुळे महिलांचे प्रमाण इतर सरकारी आणि निमसरकारी विभागापेक्षा एसटीमध्ये फारच कमी आहे.
बालसंगोपन रजा मंजूर करतानाचे निकष
एक वर्षांच्या आतील दत्तक मुलासाठी महिलांना 180 दिवस रजा लागू राहिल, एक ते तीन वर्षांपर्यंतच्या दत्तक मूलासाठी आईला 90 दिवसांची रजा मिळेल, दत्तक संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यास दत्तकग्रहण-पूर्व पोषण देखरेख ( pre-adoption foster care ) टप्प्यापासून योजना लागू होईल तर इतर प्रकरणी कायदेशीर दत्तक प्रक्रियेनंतर योजना लागू होईल. दि.26.10.1998 च्या शासन निर्णयानूसार ज्या महिलांना 90 दिवसांच्या बालसंगोपनाच्या रजेवर गेल्या आहेत. त्यांचेही दत्तक मुल जर शासनाचा निर्णय लागू झाला त्यावेळी एक वर्षांच्या आत असेल सध्या अनुज्ञेय असलेला 90 दिवसांचा कालावधी वाढवून 180 दिवसापर्यंत विशेष रजा लागू राहील.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय
एक वर्षांच्या आतील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची भरपगारी विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2017 मध्ये घेतला होता. राज्यातील सर्व कृषी व बिगर कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये तसेच, शासकीय व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होत आहे. आता एसटी महामंडळाला राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे बालसंगोपन रजा मिळेल असे सूत्रांनी सांगितले.
1) दत्तक मुलाचे वय एक महिन्याहून कमी असेल तर एक वर्षांची रजा
2 ) दत्तक मुलाचे वय 6 महिने आणि त्याहून जास्त परंतु 7 महिन्याहून कमी असेल तर 6 महिन्यांची रजा
3 ) दत्तक मुलाचे वय 9 महिने आणि त्याहून जास्त परंतु 10 महिन्याहून कमी असेल तर 3 महिन्यांची रजा