नाशिक : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केल्यानं राज्यभर आंदोलने आणि निदर्शने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही ठिकठिकाणी आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. पण नाशिकरोड येथील एक आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. राज्यभर चर्चेत असणाऱ्या छत्रपती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुताळ्याची रवानगी चक्क कचऱ्याच्या गाडीत करण्यात आली होती. या यावेळी नाशिकमधील विविध पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीचा हटके आणि लोकोपयोगी उपक्रनांमुळे राज्यभर नावलौकिक असल्याने राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रतिकात्मक पुतळा चक्क महापालिकेच्या कचरा गाडीत टाकून निषेध नोंदविला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभर रान पेटलेले असतांना राजकीय वातावरण तापलेले आहेत, त्यात आता छत्रपती शिवजन्मोत्सव समितीने केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.
ठिकठिकाणी जोडो मारो आंदोलन, पुतळे जाळणे अशी आंदोलन होत असतांना कचरा गाडीत प्रतिकात्मक पुतळा टाकून रवानगी केल्यानं हे चाकोरीबाहेरील आंदोलन नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जात असून त्यांना राज्यपाल पदावरून हटवा अशी मागणी केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं विधान केल्याने राज्यपाल यांना हटवा अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदय यांच्याकडेही पत्राद्वारे मागणी केली आहे.