भगर खाल्ल्याने विषबाधेचे प्रकार, उपवासाला भगर न खाण्याचे सरकारचे आवाहन

| Updated on: Mar 07, 2024 | 8:18 PM

राज्यात उपवासाला भगरीचे सेवन केल्यानंतर विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्याने सरकारने शक्यतो भगर खाऊच नका असे आवाहन केले आहे. जर भगर खायची असल्यास नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी देखील सूचना सरकारने जारी केल्या आहे.

भगर खाल्ल्याने विषबाधेचे प्रकार, उपवासाला भगर न खाण्याचे सरकारचे आवाहन
food poisoning
Follow us on

मुंबई | 7 मार्च 2024 : राज्यातील अनेक भागात उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर खाल्ली जात असते. भगरीमुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात घडल्यामुळे सरकारने उपवासाला शक्यतो भगर खाऊ नये असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. भगर खरेदी करताना काय काळजी घ्यावयाची याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. कोंदट वातावरणात भगरीवर तात्काळ बुरशी लागत असल्याने जनतेने भगरी खाताना अत्यंत सावधानचा बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात उपवासाला भगरीचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतू ही भगर विषबाधेला निमंत्रण देते. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस ( Aspergillus ) प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फ्युमिगाक्लेविन ( Fumigaclavine ) यासारखी विषद्रव्ये ( Toxins ) तयार होतात. आद्रतेमुळे बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. अशी बुरशी झालेली भगर जर सेवन केली तर अन्न विषबाधा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे भगर खाताना काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

भगर खाताना नेमकी काय काळजी घ्यावी

१) बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी. शक्यतो पाकीटबंद भगर घ्यावी. कंपनीचे ब्रॅंड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे आणि सूटी भगर घेऊ नका, भगर खरेदी करताना पाकीटावरचा पॅकींग दिनांक आणि एक्सपायरी डेट तपासू घ्या

२) भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवावी, त्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवून ठेवू नका, जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.

३) शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.

४) भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.

५) भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ आणि पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादितच करावे.