योगेश बोरसे, पुणे : गेल्या काही दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कारणावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेत आहे. काही दिवसांपासून भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभर निषेध व्यक्त केला जात असतांना पुण्यात राज्यपाल कोश्यारी यांनी आणखी एक विधान केले आहे. ज्या विधानावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषणासाठी उभे राहीले. मात्र भाषण सुरु होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवत त्यांना ‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असे म्हणत तक्रार मांडली. या घडल्या प्रकाराला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो ।’ असं वक्तव्य केलं आहे.
इतकंच नाही तर महिलेच्या तक्रारीनंतर भाषण सुरु असताना राज्यपालांनी छायाचित्रकारांना बाजुला व्हायचे आदेश दिले.
दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू‘ या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला. अनेकांनी तर्कवितर्क लावत आश्चर्य व्यक्त केले.
राज्यपाल भागतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवा अशी मागणी एकीकडे सुरू असतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मी राज्यपाल आहे असं मानत नसल्याचे म्हंटले आहे.
त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाने तर्कवितर्क लावले जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जर स्वतःला राज्यपाल मानत नसतील तर येत्या काळात यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.