मुंबई: राज्यात आज ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वेगवेगळ्या भागातून ग्राम पंचायतीसाठी सदस्य आणि सरपंचांची निवड होत आहे. ग्राम पंचायतीच्या या निवडणुकीकडे राजकीय विश्लेषकांच लक्ष लागून राहिलं आहे. कारण यातून भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. आतापर्यंत ग्राम पंचायतीचे निकाल हाती आलेत, त्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. भाजपा समर्थित पॅनल मोठ्या प्रमाणावर निवडून आलेत.
सांगलीच्या निकालाने वेधलं लक्ष
भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. ठाकरे गट तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सांगलीतील अशाच एका निकालाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. या निकालाच थेट पडळकर कुटुंबाशी कनेक्शन आहे.
मुलगा आमदार आणि आई सरपंच
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहे. या विजयानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया दिली. पडळकर कुटुंबात आता दोन पदं असणार आहेत. मुलगा आमदार आणि आई सरपंच असणार आहे.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
आईची सरपंचपदी निवड झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आईला फोन केला. त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून आईशी संवाद साधला. “फोन लागत नव्हता, त्यामुळे आई शेतात आहे असं मला वाटलं. या निकालाने आईला आणि मला खूप आनंद झालाय” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
वाडीतल्या लोकांनी जबाबदारी दिलीय
“आईच्या माध्यमातून पडळकरवाडीत काम करतोय. आई तुझं अभिनंदन. गावात विकासाची काम करं. शेतात जाणं बंद करं. तिथे गडी ठेवू. तुझ्यावर वाडीतल्या लोकांनी जबाबदारी दिलीय” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. या विजयाने हिराबाई पडळकर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.