नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्याला नवे पालकमंत्री (Guardian Minister) मिळाले आहे. दादा भुसे (Dada Bhuse) हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांचा पीए (PA) असल्याचे सांगत अनेक जण चकरा मारायला लागले आहेत. एकूणच नाशिक जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयात स्विय सहायक म्हणजेच ‘पीएं’चा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. खरंतर जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आशिमा मित्तल या त्याच्या प्रमुख आहेत. पण जिल्हा परिषदेत वाहनासहित प्रवेश करण्याकरिता काही बंधने आहेत. प्रशासकीय राजवट सुरु होताच लोकप्रतिनिधींच्या वाहनांना जिल्हा परिषदेच्या आवारात नो एन्ट्री करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचारी, मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या पीएच्या वाहनाला प्रवेश दिला जात आहे.
मात्र, याच प्रशासकीय काळात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वाहनासहित प्रवेश करण्याकरीता थेट पालकमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून प्रवेश मिळवत असल्याचे समोर आले आहे.
गंमत म्हणजे एकाच दिवशी अनेकांनी एकच काम सांगून वाहनासहित प्रवेश मिळवल्याने ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.
कर्मचाऱ्यांनी ही बाब अधिकाऱ्यांना सांगितल्याने याची चौकशी सुरू झाल्यावर थेट पालकमंत्री यांच्याकडून अधिकृत पीएची नावे मागितली होती.
सामान्य प्रशासनाच्या वतीने मागविण्यात आलेल्या पीए ची नावे चार व्यक्तीची देण्यात आली असून दोघे नाशिकचे तर दोघे मुंबईचे आहे.
मालेगावचे हरिश देवरे, बापू अमृतकर तर मुंबईचे विलास पाटील, दीपक पाटील हेच चारच स्विय सहायक अधिकृत असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे या व्यतिरीक्त कुठल्याही व्यक्तिला पालकमंत्र्याचे नावे प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हा परिषदेतील या पीएच्या सुळसुळाटामुळे पळकमंत्र्यांची डोकेदुखी वाढली असणार आहे. शासकीय कार्यालयात अनेक जण पालकमंत्र्यांचा पीए असल्याचा सांगून प्रवेश करत अधिकाऱ्यांना भेटत असल्याची चर्चा आहे.