जळगाव : शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत एकीकडे शिंदे गटाचा कुणीही आमदार, खासदार निवडून येणार नाही अशी टोलेबाजी करत असतांना त्याला प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये असतांना थेट संजय राऊत यांना खासदारकीवरुन सूनावलं आहे. एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत आडवे झाले असते, अशी टीका गुलाबराव पाटल यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर यापूर्वी याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मात्र स्पष्टच सूनावलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे.
आपण पक्ष बाजूला ठेवला, धर्मच टिकला नाही तर तुमचा पक्ष कुठे वाचणार आहे अशी कोपरखळीही संजय राऊत यांना गुलाबराव पाटील यांनी मारली आहे.
जळगाव येथील हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान बोलताना गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हा हल्लाबोल बघायला मिळाला.
यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या रेडयाच्या टीकेलाही प्रत्युत्तर देतांना याच रेडयांच्या जिवावर तुम्ही निवडून आल्याचा पलटवार राऊत यांच्यावर झाला होता.
आजच्या दिवशीही संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असतांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आणि खासदार पुन्हा निवडून येणार नाही असा दावा केला होता, त्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.