अनिल केऱ्हाळे, जळगाव: गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी फुलस्टॉप दिला. मी कुठेही जाणार नाही. स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे आणि अजूनही तो जपून ठेवणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आमची फळी अधिक मजबूत करणार आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र तरीही राज्यात घडणाऱ्या घडामोडींवरून तरी अजित पवार या वक्तव्यावर फार काळ ठाम राहणार नाहीत, असं दिसून येतंय. विविध पक्षांच्या आमदारांनाही असंच वाटतंय. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सद्य राजकीय स्थितीवरून जोरदार फटकेबाजी केली.
राज्यातील स्थितीवर गुलाबराव पाटील यांनी नेमकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ हवानामाचा अंदाज बघता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ढगाळ वातावरण आहे. शिवसेना -भाजपचा जोरदार पाऊस पडणार आहे…
अजित पवार यांनी सर्व शक्यता नाकारल्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, पवार काहीही म्हणाले असले तरीही त्यांना ही सगळी जुळवाजुळव करायला वेळ लागेल. कालपासून आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कोकाटे, बनसोडे, तटकरे बाई म्हणतात आम्ही अजितदादांच्या मागे आहेत. आमदार बोलतायत याचा अर्थ राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण आहे. कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अजित पवार आता राष्ट्रवादीत फार काळ थांबणार नाहीत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ अजित दादा आता थांबतील असं वाटत नाही. ते डॅशिंग नेते आहेत. त्या माणसालाही जीवन आहे. 24 तास काम करणारे माणूस आहेत. त्यामुळे ते घाबरून निर्णय घेतील असं नाही. जुळवाजुळव करायला थोडा वेळ घेतील, पण लवकरच ते भूमिका घेतील, असं सूतोवाच गुलाबराव पाटील यांनी केलंय.
पक्ष फुटण्याच्या बातम्या शरद पवार यांनीही नाकारल्या. यावरून गुलाबराव पाटील यांनी चपखल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ असं कोणी म्हणेल का? की पक्ष फुटतोय शरद पवार आहेत ते.. शरद पवार साहेब जे बोलतात त्याच्या उलट घडतंय असं लोक म्हणतात. हा भविष्यासाठीचा इशारा असू शकतो….
अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडणार अशी शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदेदेखील 40 आमदारांसह बाहेर पडले होते.यावरून गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ राज्यात सध्या 40 हा आकडा महत्त्वाचा मानला जातो. 40 चांगला आकडा आहे.. बघू कधी पाऊस पडतो… जेव्हा काही या गोष्टी घडतात तेव्हा काही ना काही आखलेला असतं. सतरंजीवर बसायचे आहे तर केवढी पट्टी अंथरायची हे आपण ठरवत नसतो.. हे आधीच ठरलेलं असतं…
अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली तर शिंदे-फडणवीस-अजित पवार असं अमर अकबर अँथनीचं सरकार असेल, अशी टिप्पणीही गुलाबराव पाटील यांनी केली.