जळगाव : महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या समर्थनार्थ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पुढे आले आहेत. ‘धनंजय मुंडेंनी स्वतः जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. (Gulabrao Patil said that opposition is trying to politicize the matter of Dhananjay Munde case)
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज (16 जानेवारी) सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
“धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाबाबत स्वतः कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी नाहक राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच, ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील, असा विश्वासदेखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर स्वतः कबुली दिली आहे. एखादा माणूस अशी कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. “धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. फक्त कुणावर अन्याय होता काम नये. त्या महिलेविरुद्ध 4 ते 5 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यावरुन जनतेने समजून घेतलं आहे,” असं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :
(Gulabrao Patil said that opposition is trying to politicize the matter of Dhananjay Munde case)