प्राजक्ता माळी आणि सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली मोठी मागणी

| Updated on: Dec 29, 2024 | 4:37 PM

शनिवारी प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली, यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ता माळी आणि सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली मोठी मागणी
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस हे अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. वाल्मिकी कराड यांना अटक करा, जोपर्यंत देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होते आहे. दरम्यान सुरेश धस यांनी बोलताना तीन अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये प्राजक्ता माळी यांचं नाव देखील होतं, त्यानंतर शनिवारी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं, सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तर मी माफी मागणार अशी प्रतिक्रिया यावर सुरेश धस यांनी दिली आहे. दरम्यान या वादावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

कला क्षेत्रातील महिलांना अपमानित करणे त्यांची खिल्ली उडवणे हे चुकीचं आहे. यामुळे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागावी अशी मागणी गुणरत्न  सदावर्ते यांनी केली आहे. रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी असतील यांनी अल्पवधीत चांगलं काम करून आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र इथे जाणून -बूजन कलाकारांचा अपमान केला जात आहे, असा आरोप यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. कालपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. एक लक्षात ठेवा आता कुठेही राजेशाही आणि पाटीलकी चालत नाही. प्रशासन आणि पोलीस या धमक्यांची योग्य ती दखल घेतील, कारवाई होईल असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.