सातारा: सातारा पोलिसांच्या (satara police) ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आज सकाळी सातारा पोलीस सदावर्ते यांना कोर्टात घेऊन गेले. त्यांना कोठडीतून कोर्टात नेत असताना सदावर्ते यांनी जोरजोरात घोषणा द्यायलाय सुरुवात केली. वंदे मातरम… मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज है… अशा जोरजोरात घोषणा सदावर्ते यांनी दिल्या. हात उंचावून सदावर्ते घोषणा देत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंताही दिसत होती. मात्र, सदावर्ते घोषणा देत असतानाच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गाडीत बसवले आणि कोर्टाच्या दिशेने घेऊन गेले. आज सदावर्ते यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. 2020 साली खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना कोर्टात सादर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्ट त्यावर काय निर्णय देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात उभं करण्यात आलं असून कोर्टात सरकारी वकील अंजुम पठाण युक्तिवाद करत आहेत. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण चर्चेत कोणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वशंज असल्याचा उल्लेख केला याचा पोलिसांना तपास करायचा आहे. आरोपी वकील आहेत. कायद्याचे ज्ञान असूनही भेद आणि जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सदावर्ते यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना त्यांचा ताबा हवा आहे, असं सांगत सरकारी वकिलांनी सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
तर, सदावर्ते यांचे वकील सचिन थोरात यांनीही या प्रकरणी युक्तिवाद सुरू केला आहे. केवळ टीव्हीवर ऐकून तक्रारदाराने सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच सदावर्ते यांना जी नोटीश पाठवण्यात आली आहे. त्यावर दिनांक नाही. त्यामुळे ही कायदेशीर अटक झाली नाही. तसेच सदावर्तेंकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी हे मुंबईला गेल्यामुळे सचिन थोरात, सतीश सूर्यवंशी, प्रदीप डोरे हे वकील त्यांची बाजू मांडत आहेत.
संबंधित बातम्या: