मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशील (Money Counting Machine) सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कोठडी मुक्कामी आहे. या कोठडी मुक्कामाची सुरूवात मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून झाली. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन भडकावल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर मुंबईत सुरूवातील गुन्हा दाखल झाला. मुंबईत पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यावर गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांच्या काठडीत जावं लागलं. त्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढले. मात्र आता ही पैसे मोजायची मशील सापडल्याने राज्यात सध्या पुन्हा खळबळ माजली आहे.
सरकारी वकील यांनी कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून गुणरत्न सदावर्ते यांनी मालमत्ता घेतल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत हे कोर्टात सध्या सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सदावर्तेंकडून अनेक वकीलांनी युक्तीवाद केला आहे.
सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात काही एसटी कर्मचाऱ्यांनीही सदावर्तेंना पैसे दिल्याचा दावाही केला होता. तर सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. ते त्यांचा मोबाईलही देत नाही, असेही प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे. तर पवारांच्या घराबाहेरील आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना उद्या कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर आरोपींची कोठडीही कोर्टाने वाढवली आहे.