ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा (Amrit Mahotsav)निमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान (Campaign) शहरात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच् यावतीने मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा घेतला. महापालिका भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित बैठकीस अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त शर्मा म्हणाले की, शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम राहावी उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित ‘हर घर झेंडा’ अमृत अभियानांतर्गत शहरात जास्तीत जास्त ध्वज लावण्याचे नियोजन आहे. 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. यामध्ये हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करणे, स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरीचे आयोजन करणे, एन.सी.सी., एन.एस.एस. कॅडेटचे संचलन करणे, सायक्लोथॉन / मॅरेथॉनचे आयोजन करणे, शालेय, महाविद्यालय स्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करणे, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे प्रदर्शन भरविणे तसेच आजादी का अमृत महोत्सवाचा लोगो सर्व शासकीय इमारतीवर लावणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी संबधितांना दिल्या.
दिनांक 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवा निमित्त प्रत्येक नागरिकाने आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक ती मदत करावी,असे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले. या उप्रक्रमानिमित्त कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा, जाणीव जागृती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबधितांना दिल्या. (Har Ghar Tiranga Abhiyan in Thane on the occasion of Amrut Mahotsav of Independence)