चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : हरीश्चंद्र गडावर अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यात एनडीआरएफ टीम आणि ग्रामस्थांना यश आलंय. तब्ब्ल 20 तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर सगळे ट्रेकर्स सुखरूप खाली उतरले. मात्र अतिउत्साही ट्रेकर्समुळे संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा वेठीस धरली गेली. त्यामुळे ट्रेकर्सच्या नियमांबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.
हरीश्चंद्र गड हा अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तिनही जिल्ह्यांच्या सरहदद्दीवर आहे. ट्रेकर्स या किल्ल्यावर कायमच येत असतात. अनेक ट्रेकर्स इथे रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग आणि ट्रेकिंगसाठी येतात. मात्र रविवारी मुंबई आणि औरंगाबादवरून आलेल्या ट्रेकर्सला त्यांच्याच निष्काळजीपणामुळे मृत्यू अगदी जवळून अनुभवावा लागला.
सोबत नेलेले ट्रेकिंगचे साहित्य तपासून आणि अभ्यासून नेलं नाही तर काय होऊ शकतं याचा अनुभव या ट्रेकर्सना आला. कोकणकडा या भागातून दोरखंड खाली सोडून रॅपलिंगचा या ट्रेकर्सचा प्लॅन होता. मात्र खाली उतरत असताना त्यांच्या सोबत आणलेला रोप अपूर्ण पडला आणि रात्रभर त्यांना अक्षरशः काळोख्या अंधारात मदतीची वाट बघावी लागली.
यापैकीच एका ट्रेकरने मग एनडीआरएफ आणि पोलिसांना आपण कोकणकडावर अडकल्याची माहिती दिली आणि प्रशासन अक्षरशः खडबडून जागं झालं. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपेरेशन सुरु करण्यात आलं. राज्यातला सर्वाधिक दोन नंबर उंच असलेला हरिश्चंद्र गड प्रचंड अजस्त्र तर आहेच, मात्र नवख्या ट्रेकर्सने इथे अति उत्साह दाखवू नये असा सल्ला रहिवासी देतात.
सुमारे 1850 फूट उंच असलेल्या गडावर ग्रामस्थ, वन विभाग आणि प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. घनदाट जंगल, मोठे दगड, किर्रर्र अंधारी झाडी यातून मार्ग काढत अधिकारी या ट्रेकर्सच्या मदतीसाठी धावले. टीव्ही 9 ची टीमही या यंत्रणेसोबत होती.
तब्ब्ल 20 तास कोकणकड्याच्या एका टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर या ट्रेकर्सला आणण्यात आलं. रोपच्या सहाय्याने त्यांना खाली उतरून बेस कॅम्पवर नेण्यात आलं. तब्ब्ल 20-22 तासांनी सगळ्या ट्रेकर्सला सुखरूप खाली आणण्यात आलं.