आज शरद पवार इंदापूर दौऱ्यावर होते. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत, शरद पवार यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांचा दौरा आटोपताच पक्षाला इंदापूरमध्ये पहिला धक्का बसला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. नाराज नेत्यांच्या मनातील नाराजी काढण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. विधानसभेच्या उमेदवारीमुळे कोणीतरी इकडे तिकडे नाराज झाला असेल. सर्व नेते महाविकास आघाडीचं काम करतील. तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात देखील सत्ता बदल हवा आहे. तशी हवा इंदापूर मतदार संघात वाहू लागली आहे. शरद पवार यांचा हा दौरा जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी होता.मतदान वाढल्यानंतर कोणी ना कोणी डॅमेज होणारच आहे. या तालुक्यातील लोक शंभर टक्के यावेळी बदल करतील, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्याच्या शेतमालाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हे सरकार हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशी भावना निर्माण होत आहे. वीजबिलमाफी फसवी आहे. महाराष्ट्राची पीछेहाट होत चाललेली आहे. लोकांचं मत असं आहे की लोकांना यावेळी सरकार बदलायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात शंभरटक्के येणार आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान आज इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली.