प्रचाराच्या ‘सुपरसंडे’ला स्वाभिमानी-ठाकरे गट समोरासमोर; धुराळा बसण्यापूर्वीच झाला वाद

| Updated on: May 05, 2024 | 3:28 PM

Ichalkaranji Rally Clashes : लोकसभा निवडणूक 2024 मधील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावतील. पण धुराळा बसण्यापूर्वीच इंचलकरंजीत स्वाभिमानी आणि ठाकरे गटामध्ये तणावाची ठिणगी पडली. तळपत्या उन्हात दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

प्रचाराच्या सुपरसंडेला स्वाभिमानी-ठाकरे गट समोरासमोर; धुराळा बसण्यापूर्वीच झाला वाद
कार्यकर्ते आमने-सामने
Follow us on

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अनेक शहरात आजचा रविवार हा प्रचाराचा सुपरसंडे ठरला आहे. एकाच दिवशी अनेक पक्ष रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची तारंबळ उडाली आहे. कोल्हापूरमधील इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. भरदुपारी दोन्ही बाजूने घोषणांचा पाऊस सुरु होता. दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलीस यंत्रणा मात्र चांगलीच घामाघूम झाली.

इचलकरंजीत काही काळ तणाव

इचलकरंजीत राजू शेट्टी यांची पदयात्रा होती तर सत्यजीत पाटील हे पण प्रचारासाठी शहरात होते. दोघांचे समर्थक शाहू चौकात समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरु केला. स्वाभिमानी शेतकरीची पदयात्रा ही कोहिनूर चौकातून इचलकरंजीच्या दिशेने जात होती. ही पदयात्रा शाहू चौकात आली. तर सत्यजीत पाटील यांची पण रॅली याच चौकात आली. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर एकच घोषणाबाजी सुरु झाली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घोषणा सुरु केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही गट हटायला तयार नसल्याने गोंधळात अजून भर पडली.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्ते हटायला तयार नव्हते. घोषणाबाजीमुळे हा परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते सरसावले. पोलिसांनी पण दोन्ही गटांन दूर करण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढल्याने शाहू चौकात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तर उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजीत पाटील सरुडकर, शिंदे सेनेकडून धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. यावेळी हातकंणगले लोकसभा मतदारसंघात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी, महाविकास आघाडी, महायुतीसोबतच वंचित पण मैदानात उतरल्याने या मतदारसंघात रंगत वाढली आहे. कोण-कोणाला धोबीपछाड देते, यावर खल सुरु आहे. कार्यकर्ते अंदाज बांधत आहेत.