मुंबई का तुंबली ? रात्रभरात किती पाऊस पडला? अजितदादांचं ट्विट काय?

| Updated on: Jul 08, 2024 | 12:54 PM

मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. झोपडपट्टी परिसरात आणि खाडी किनारीच्या भागात तर घरांमध्ये पाणी साचलं आहे. रात्रभराच्या पावसाने दाणादाण झाल्याने मुंबईकर चांगलेच वैतागले आहेत.

मुंबई का तुंबली ? रात्रभरात किती पाऊस पडला? अजितदादांचं ट्विट काय?
Follow us on

मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. रात्रीपासूनच मुंबईत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसाचा केवळ सामान्यांनाच नव्हे तर रेल्वे आणि एसटी, बसेस सेवांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे. रात्रभरात तब्बल 300 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने ही दाणादाण उडाल्याचं समोर आलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून मुंबईत किती पाऊस पडला याची माहिती दिली आहे. काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

पालिका आणि सरकारचे दावे फोल

काँग्रेस नेते रवि राजा यांनी मुंबई तुंबल्याने पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. मुंबईची तुंबई झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही, असं पालिकेने सांगितलं होतं. त्यासाठी महापालिकेने 250 कोटी रुपये खर्च केले होते. पण आज मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाल्याने पालिकेचे दावे फोल ठरले आहेत. राज्य सरकारनेही यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा देला होता. पण आता मुंबई जलमय झाल्याचं राज्य सरकारनेच पाहावं. कुर्ला, साकीनाका आणि सगळ्या मुंबईतच पाणी साचलं आहे. महापालिकेकडून करदात्यांची लुटमार सुरू असल्याचंच म्हणावं लागणार आहे, असं रवी राजा म्हणाले.

एक्सप्रेसचा खोळंबा

कसारा घाटात दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला आहे. मुंबई कडे जाणार्‍या आणि येणाऱ्या गाड्या जिथल्या तिथे थांबल्या आहेत. राजधानी एक्सप्रेस नाशिकला, सेवाग्राम एक्सप्रेस देवळालीला आणि पंचवटी एक्सप्रेस इगतपुरीला थांबली आहे.

पाय घसरून पडली, पण जीव वाचला

दरम्यान, पनवेलहून ठाण्याला जात असताना बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात येताना एक महिला घसरून पडली. रेल्वेचा पहिला महिला डबा तिच्या अंगावरून गेला. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनामध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्यांचे प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत.

मला अशा गोष्टींची सवय

दरम्यान, आमदारांनाही आज पावसाचा प्रचंड फटका बसला. पावसामुळे अनेक एक्सप्रेस मध्येच रखडल्या आहेत. बराच वेळ झाला तरी या ट्रेन पुढे सरकत नसल्याने आमदारांना रेल्वे रुळावरून पायपीट करत रोडवर यावं लागलं आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी, संजय गायकवाड आणि जोगेंद्र कवाडे हे हावडा एक्सप्रेसने येत होते. पण एक्सप्रेस बंद पडल्याने त्यांना पायी यावं लागलं. याबाबत अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज मुंबईत येत असताना रेल्वे ट्रॅकमधून चालत आलो. मला आपत्कालीन घटनांच्या वेळी बाहेर पडायची सवय आहे. मी ग्रामीण भागातून आलो आहे. मला सर्व गोष्टींची सवय आहे. रेल्वेमध्ये तीन साडे तीन तास अडकलो होतो. मग चालत निघालो. रेल्वेने अश्या वेळी ट्रेन प्लँटफॉर्मला थांबवण्याचा प्रयत्न करावा. मुंबईतील स्थिती सध्या नियंत्रणात आहे, असं सांगतानाच भरतीच्या वेळी समुद्र किनारी जाऊ नका, असं आवाहन अनिल पाटील यांनी केलं.