नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे अनेक शाळांनी आजच्या दिवस सुट्टी जाहीर केलीय. नांदेड शहरासह अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस (Rain) झालाय, तर पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलय. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. दरम्यान, नांदेडमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफचे एक पथक (NDRF Tim) तैनात ठेवण्यात आलेले आहे. गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये देखील मोठी वाढ झालीयं.
नांदेड जिल्हात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता नदी आणि ओढेकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलंय. जिल्ह्यात रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेलीय.
अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरलं आहे, तर तालुक्यातील शेलगाव , शेणी, कोंढा, देळूब सह अनेक गावांचा संपर्क सकाळपासून तुटलेला आहे. लोहा तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रात्रीपासूनच शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडीत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी देखील नाहीयं. सध्याच्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्हातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान देखील झाले आहे.