चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र सत्ताधारी पक्ष आम्हालाच उशिरा आले असे म्हणतात, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. ते चंद्रपुरात बोलत होते. येथील नुकसानग्रस्त भागाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षाच्या सर्व आमदार-खासगारांनी ओल्या दुष्काळाची (Wet drought) मागणी केल्याचेही ते म्हणाले. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी त्यांनी केली. ते म्हणाले, की चंद्रपूर येथे धान, कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान (Crop Damaged) झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 62-63 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अजित पवार म्हणाले, की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अजून पंचनामे झालेले नाहीत. शहरातील ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांडपाणी व्यवस्थापन प्लांट नदीच्या शेजारी आहे. शहरात सिमेंट रस्ते आहेत. पण तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही. नदीच्या शेजारी प्लॅाटिंग सुरू आहे. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काहींची घरे दिसत आहेत. मात्र भिंती पूर्ण ओल्या झाल्या आहेत. त्या भिंती वाळल्यानंतर अशी घरे राहण्यायोग्य असणार नाहीत. ती कमकुवत होतील. त्यामुळे शासनाने त्याचाही पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
चंद्रपूर मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. सरकारने आदेश दिलेले पंचनामे पूर्ण झाले नाहीत. आता तातडीची मदत किमान दहा हजार रुपये व्हावी. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करायचे असेल तर हेक्टरी 75 हजारांची म्हणजे एकरी 30 हजारांची मदत करावी. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता यावी, यासाठी शासनाने सहाय्य करावे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनीदेखील जबाबदारीचे भान ठेऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. पुन्हा पुन्हा घटना घडू नये, याकरिता योग्य ती कार्यवाही शासनाने करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.